चंद्रपूर : दहा दिवस पूजा-आराधनेने गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर रविवारी चंद्रपुरातील सार्वजनिक बाप्पांचे साध्या पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे. कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या कार्यक्रमांना फाटा दिला तसेच प्रबोधनपर देखावेही तयार केले नाहीत. विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत अंशत: बदल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य मार्गाने विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कस्तुरबामार्गे महात्मा गांधी मार्ग व शहरातील प्रमुख मार्गावरून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने पोलीस वाहतूक शाखेने मार्ग आखून दिले आहेत. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून दररोज होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.
अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे कोरोना सावटातच शुक्रवारी घराघरात आगमन झाले होते. बाप्पाच्या मूर्ती खरेदीसाठी चंद्रपुरातील आझाद गार्डन परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध जाहीर केल्याने दहा दिवस नियमांचे पालन करूनच हा उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या घटली. सार्वजनिक मंडळांना ४ फूट व घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा ठेवण्यात आली. त्यामुळे यंदा सुमारे ५०० मंडळांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली नव्हती. तसेच गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांना मनाई असल्याने यंदाही भाविकांचा हिरमोड झाला. चंद्रपूर मनपा हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णत: बंदी घातली आहे. याचा चांगला परिणाम शहरात दिसून आला. सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर भर दिला. रविवारी हाेणाऱ्या विसर्जनासाठी दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
बॉक्स
स्वयंसेवक व स्वच्छता पथक सज्ज
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून बाप्पांचे विर्सजन व्हावे, यासाठी मनपा, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. स्वयंसेवक व स्वच्छता पथक तयार करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना व मंडळांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
बॉक्स
फिरत्या विसर्जन कुंडांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मनपा प्रशासनातर्फे यंदा ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विभागनिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक उत्स्फूर्तपणे गणेशमूर्तींचे विसर्जन या कृत्रिम कुंडांमध्ये करत आहेत.
पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी कुंड
झोन क्रमांक - १
१) मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट
२) बाबा आमटे अभ्यासिका
३) दाताळा रोड, इरई नदी
४) तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर)
झोन क्रमांक - २
१) गांधी चौक
२) लोकमान्य टिळक शाळा, पठाणपुरा मार्ग
३) शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड
४) विठोबा खिडकी, विठ्ठल मंदिर वाॅर्ड
५) रामाळा तलाव
६) हनुमान खिडकी
७) महाकाली प्राथ. शाळा, महाकाली वाॅर्ड
झोन क्रमांक - ३
१) नटराज टॉकीज (ताडोबा मार्ग)
२) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा, बाबूपेठ
३) मनपा झोन कार्यालय, मूल मार्ग
४) बंगाली कॅम्प चौक