चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीचा विचार युवकांच्या मनामनापर्यंत पोहोचवत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ करणे आवश्यक आहे. निवडणुका जिंकणे आपले अंतिम लक्ष्य नाही. ‘पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढते जाना, सब समाज को साथ लिये हमको है आगे जाना’ अशी आपली वाटचाल असली पाहिजे. युवकांचे विविध प्रश्न, शासकीय सेवेसाठी वयोमर्यादा वाढवावी, रोजगारांचा प्रश्न असे युवकांच्या हिताचे विविध प्रश्न हाताळत भाजयुमोच्या माध्यमातून रचनात्मक, संघर्षात्मक, आंदोलनात्मक कार्यक्रमांची आखणी करावी, असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भाजयुमो चंद्रपूर महानगर शाखेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, यश बांगडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘एकच चर्चा युवा मोर्चा’ हे ब्रीद तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा पक्षाची ध्येय-धोरणे घेऊन तुम्ही युवकांमध्ये जाल. युवा मोर्चा हा सर्व समाज, सर्व धर्मातील युवक-युवतींना आपल्या हक्काचे व्यासपीठ वाटेल अशी कृती युवा मोर्चाकडून अपेक्षित आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तरूणाईचे विविध प्रश्न, समस्या घेऊन संघर्ष करणे आवश्यक आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाला अनुसरून युवकांनी भाजयुमोच्या माध्यमातून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले. तर भाजयुमोच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्याचा अहवाल प्रज्वलंत कडू यांनी सादर केला. बैठकीला भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.