घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरात तीन महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक विद्यालये, प्राथमिक शाळा इंग्रज कॉन्व्हेंट आहेत. हजारोंपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी शहरातील सायकलने शाळा-महाविद्यालयात जातात. शहरात वाहनांची संख्या वाढली पण रस्ते हरवून बसले. अतिक्रमणामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेड उभारणी करून त्यातच दुकाने थाटली. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. मोठे व्यापाऱ्यांची जड वाहने शहरात येतात. वाहनातून साहित्य उतरविण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील दररोज होणारी वाहतूक प्रभावित होते. दोन वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. शहरातील जड वाहतूक बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून केल्या जात होती.मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता या समस्येने गंभीर रूप घेतले. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतरण झाले. दरम्यान शहरातील जड वाहतूक बंद करण्याचा ठराव नगरपरिषदने पारीत केला होता. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. शहरातील वाहतुककोंडी लक्षात घेऊन या ठरावाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे वाटत होते. पण हा ठराव कागदावरच राहिला. मनमानी चालणाऱ्या वाहनांमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे.जडवाहतुकीला आळा बसला नाही. सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे हाल होतात. नगरपरिषद पदाधिकाºयांना ही समस्या माहिती असूनही कुणी बोलायला तयार नाही. शहरातील जड वाहतूक मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे.न. प. कार्यकारी मंडळाने यासंबंधीचा ठराव पारित केला आहे. व्यापाऱ्यांना नोटीसाद्वारे सूचना देण्यात येणार आहे. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करू.- चंद्रकांत चव्हाण,मुख्याधिकारी, न.प.नागभीड
ठरावानंतरही अंमलबजावणी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 10:05 PM
नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देवाहतुक कोंडीने नागरिक त्रस्त : रस्त्याच्या कडेला थाटली दुकाने