लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कमी खर्चात आणि लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळले होते. मात्र यावर्षी सोयाबीनचे दर कोसळले. त्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी झाल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, सध्या ४ हजार ३०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीन पोहचले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे आता विकण्यासाठी सोयाबीनच नाही. अगदी काहीच शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरी ठेवले आहे.
सध्या शेती हंगाम सुरु आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने उसंत घेतली असली तरी सध्या पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात फारसे उत्पादन झाले नाही.
त्यातच भाव सुद्धा नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन कारावे लागले. त्यामुळे कापूस तसेच अन्य पिकांकडे शेतकरी वळले आहे. साधारणतः दिवाळीमध्ये सोयाबीन निघते. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांकडे पैशाची चणचण असते. त्यामुळे शेतकरी भाव मिळो, अथवा न मिळो गरज भागविण्यासाठी सोयाबीनची विक्री करतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीनच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे भाव वाढ झाली तरी त्याचा लाभ मात्र शेतकऱ्यांना नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
बाजारभाव काय? (₹)शेतमाल प्रतिक्विंटल भावसोयाबीन ४३००हरभरा ४७००तूर १०,६००
तुरीचे भाव वाढलेमागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुरीचे दर वाढले आहे. तुरीला गेल्या वर्षी ७ ते ८ हजार प्रतिक्विंटल भाव होता. यावर्षी १० हजार ६०० रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत आहे.
कोण काय म्हणतयकमी खर्चात लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यापेक्षा दुसरे पीक घेतलेले बरे. सध्या तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. त्यामुळे भाव वाढूनही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना काहीच नाही.-रोहन रामटेके
"चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, धान पीक घेतल्या जाते. मात्र सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. एकीकडे भाव राहत नाही. दुसरीकडे बी- बियाणे, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. शेती कशी करावी हा प्रश्न आहे. "- रमेश खनके