पोंभुर्णा (चंद्रपूर) : ४३ अंश तापमानाने चंद्रपूर जिल्हा होरपळून निघत असतानाच पेसा कायदा, इको सेन्सेटिव्ह झोन, सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक या प्रमुख व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी बांधवही मंगळवारी पेटून उठले. पोंभुर्ण्यातील जुन्या बसस्थानक चौकात जन आक्रोश, रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करीत रखरखत्या उन्हात वाहतूक रोखून धरली. लहान चिमुकल्यांनीही ‘जल, जंगल, जमीन हमारी है’ हा नारा देत आंदोलनाला बळ दिले.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असा पवित्राही आंदोलकांनी घेतला असल्याने हे आंदोलन आणखी किती चिघळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात चिमुकली मुले व महिलांचीही मोठी उपस्थिती होती. आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगरकार यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टी व बहुजन समाजाच्या सहकार्याने आदिवासी समाज बांधवांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आदिवासीबहुल गावांना ५ वी व ६ वी अनुसूची अंतर्गत तात्काळ पेसा कायदा लागू करावा, पोंभुर्णा तालुक्यातील वन जमिनी व महसूल जमिनीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वहिवाट करीत असलेल्या बहुजनांना तात्काळ पट्टे देण्यात यावे, सुरजागड लोह प्रकल्पाची भरधाव वाहतूक पोंभुर्णा शहरातून बंद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह आणखी महत्त्वाच्या नऊ मागण्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनापुढे ठेवल्या आहेत.
आदिवासी नेते जगन्नाथ येलके व देवाडा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच विलास मोगरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंदाजे तीन हजारांहून अधिक समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनाला यांचाही पाठिंबा
या आंदोलनाला काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन भटारकर यांची उपस्थिती होती.
आंदोलनस्थळीच सर्वांची जेवणाची व्यवस्था
तेलंगाणा राज्यातील १०० जणांचे पारंपरिक ढेमसा व घुसाडी नृत्य आंदोलनस्थळी दिवसभर सुरू होते. याशिवाय आंदोलकांनी जेवण, नाश्ता, चहा व पिण्याच्या पाण्याची सोय आंदोलनस्थळीच केली होती. आंदोलकांना जेवणाची व्यवस्था म्हणून ६० क्विंटल तांदूळ जमा केले होते व आंदोलनस्थळीच स्वयंपाक करण्याची व्यवस्था केली होती.
जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार आहे. मागण्या रास्त आहे म्हणून आंदोलनाला सर्वांची साथ मिळत आहे.
- विलास मोगरकार, सरपंच, देवाडा खुर्द.