मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहर अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. धूळ, प्रदूषित पाणी, धूर, प्लास्टिक, वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. तर प्राणघातक वायू प्रदूषणामुळे ज्येष्ठाचा श्वास कोंडला आहे.
शहरात पेपर फॅक्टरी, कोळसा उत्पादन, लाकूड आणि वृक्षांनी नटलेले घनदाट वनवैभव असल्यामुळे बल्लारपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारे वनवैभव व उद्योगामुळे होणारे प्रदूषण याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वेकोलि परिसरात कोळशाच्या धुरांमुळे नागरिकांना डोळ्यांचा त्रास, दमा, हृदयविकार, पोटाचे विकार, विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.
वर्धा नदीही प्रदूषितबल्लारपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पवित्र पाणी काळे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले आहे. ते पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे. प्रत्येक सणासुदीला भाविक वर्धा नदीच्या गणपती घाटावर उत्सव साजरा करण्यासाठी येतात व पाणी ग्रहण करतात व प्रदूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र याकडे प्रदूषण मंडळ नेहमीच दुर्लक्ष करत आहे.
धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ताशहरातून २४ तास शेकडो वाहनातून लोखंड, कोळसा, सिमेंट, लाकूड, बांबू, फ्लाय ऐशचे कण पडणाऱ्या धुळीने प्रदूषण होते. त्यामधून निघणारे पार्टीकल नागरिकांच्या डोळ्यात जाऊन डोळे खराब होत आहे. अनेक आजार जडले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नगर परिषदेच्या शेतावर लावलेले धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ता झाले आहे.
शहरातील जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली असल्याने हजारो नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.-अमित पाझारे, पर्यावरणप्रेमी, बल्लारपूर