मूल (चंद्रपूर) : येथील सहजिल्हा निबंधक कार्यालयात कार्यरत प्रभारी उपनिबंधक वैशाली वैजनाथ मिटकरी यांना १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. १२) ला रात्री आठ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील मारोडा येथे केली. मारोडा येथील रहिवासी असलेल्या व वकील म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे मारोडा येथील आहे. त्यांच्या पक्षकाराची मूल येथील शेतजमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करायची होती. यासाठी त्यांनी शेतीसंबंधी दस्त नोंदणीची कागदपत्रे तयार केली. त्यानंतर दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांच्याकडे जाऊन दस्त तपासणी व शेतजमिनीचे मूल्यांकन काढून दस्ताची मुद्रांक व नोंदणी फीबाबत विचारणा केली. मात्र, या कामासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त १५ हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीनंतर १० हजार रुपयांत काम करण्याचे ठरले. मात्र, लाच द्यायची नसल्याने त्यांनी तक्रार दाखल करताच चंद्रपूर येथील एसीबीने सापळा रचून मिटकरीला रंगेहाथ पकडले. गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई नागपूरचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपाधीक्षक मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, पोहवा. हिवराज नेवारे, पो.अ. वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी केली आहे.