चंद्रपूर : कडक उन्ह व वादळी वाऱ्यासह पाऊस असा खेळ सुरू असतानाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाच्या तीव्रतेने वाघ जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पर्यटकांच्या गर्दीत वाघ मोहरली मुख्य रस्त्यावर सायंकाळी दिसून आला. वाघ रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबली होती.
देशातील सर्वाधिक वाघांचा जिल्हा अशी चंद्रपूर ची सर्वदूर ओळख झाली आहे. आज घडीला २५० वाघ या जिल्ह्यात आहे. ताडोबा प्रकल्पात ९१ वाघ आहेत. त्यामुळे ताडोबा प्रकल्पाकडे पर्यटकांचा सर्वाधिक ओढा आहे. गतवर्षी अडीच लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी ताडोबा प्रकल्पाला भेट दिली. यावर्षी देखील पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. काल रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी व दुपारच्या सफरीत पर्यटक ताडोबात गर्दी करून होते. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास पर्यटक मोहरली मुख्य रस्त्याने जात असताना या मार्गावर एक पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाने पर्यटकांना दर्शन दिले.
हा वाघ रस्ता पार करून जंगलात निघून गेला. वाघ रस्ता पार करीत असताना दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली होती. वाघ रस्ता पार करून जंगलात जात नाही तोवर पर्यटक रस्तावर होते. जंगलात वाघ गेल्यानंतर बराच वेळ पर्यटकांना दर्शन देत होता. वाघ रस्त्यावर आला तेव्हा पर्यटक राजेंद्र गर्गेलवार यांनी वाघाचे चित्रीकरण केले. सध्या वाघ मनसोक्त दर्शन देत असल्याने पर्यटक देखील खुश झाले आहेत.