पुढच्या काळात आघाडीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार : विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 02:04 PM2022-07-16T14:04:53+5:302022-07-16T14:05:43+5:30
पुढील अडीच वर्षांत अनेक कामांचे नियोजन केलेले होते. मात्र नव्याने आलेल्या सरकारने कामे रद्द करणे हे क्लेशदायक आहे, असा आरोप त्यांनी केला.
चंद्रपूर : राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेने द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला हा निर्णय शिवसेनेचा आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र आले होते. आता सत्ता राहिली नाही. शिवसेना वेगळ्या विचारधारेचा पक्ष आहे. तो आपल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. आगामी काळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहील वा नाही हा निर्णयही या तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेतील, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षांत कोरोना, चक्रीवादळांसारखी संकटे आली. या संकटावर सरकार मात करीत होते. आता पुढची अडीच वर्षे कामाची होती. मात्र सत्ता गेली. सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. चक्रीवादळ, पुरामुळे राज्यातील २२ लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली. त्यांना १४ हजार कोटींचे पॅकेज दिले, याकडे वड्डेटीवार यांनी लक्ष वेधले. गेल्या अडीच वर्षांत जे करता आले ते करण्याचा प्रयत्न केला. पुढील अडीच वर्षांत अनेक कामांचे नियोजन केलेले होते. मात्र नव्याने आलेल्या सरकारने कामे रद्द करणे हे क्लेशदायक आहे, असा आरोप त्यांनी केला.
दारूबंदी उठविणे योग्य
दारू पूर्वी अवैध मिळत होती. आता ती वैध मिळते. अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील अर्थव्यवस्था रुळावर आली आहे. चंद्रपुरात कोणीही थांबायला तयार नव्हते. अनेकांनी आपले बस्तान नागपूरला हलविले होते. ते आता चंद्रपुरात स्थिरावत आहे, अशा शब्दात वडेट्टीवारांनी दारूबंदी उठविल्याचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले.
क्राॅस मतदान करणाऱ्यांची नावे कळली
राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत क्राॅस मतदान केल्याचा विषय काँग्रेसने गंभीर घेतला आहे. सर्वांची नावे कळली आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी करवाई करणारच, अशी माहितीही यावेळी वडेट्टीवार यांनी दिली.