घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगास ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचाही विसर पडला. प्रकाराने नागभीड तालुक्यातील आठ ग्रामपंचायती निवडणुकीविना आहेत. परिणामी, या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामास लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नागभीड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची मुदत संपायला आली होती.
यात नवेगाव पांडव, उश्राळ मेंढा, गंगासागर हेटी आणि खडकी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वास्तविक, जानेवारी महिन्यातच या ग्रामपंचायतींच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र, प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने प्रशासनाकडून या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही. मुदत संपल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर येनोली माल, सोनापूर तुकूम, वासाळा मेंढा आणि किटाळी मेंढा या ग्रामपंचायतींची मुदत नुकतीच ऑगस्ट २०२४ मध्ये संपली. या ग्रामपंचायतींची मुदत संपत होती, तेव्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले. त्यामुळे प्रशासन या गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास असमर्थ ठरले.
उत्साहावर पाणी निवडणुकांना घेऊन या आठही गावांतील चावडीवर गप्पांचे फड रंगायला लागले होते. गावात उमेदवारांचे पॅनल तयार करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र, निवडणुका घेण्यात न आल्याने उमेदवार व नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. यावेळेस येथील सरपंचांची निवड थेट पद्धतीनेच या होणार आहे. यादृष्टीने गावातील राजकीय पक्षांचे प्रमुख यांच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, आता या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीनंतरच होतील, असे गृहीत धरून चर्चा आणि हालचालींना इच्छुकांकडून पूर्णविराम देण्यात आला आहे
स्वराज्य संस्थांच्या इच्छुकांनी संपर्क वाढविला गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही 'वेटिंगवर आहेत. या स्वराज्य संस्थांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारासोबत आपलाही प्रचार करून घेतला. आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा हाच प्रयत्न आहे.