चंद्रपूर : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (मुलींची) आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील पाणीपुरवठा मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने निवासी मुली तसेच आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींना भरउन्हात पाण्याकरिता भटकावे लागत आहे.
नेहमी कागदावरच खरेदी प्रक्रिया राबविणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिण्याच्या पाण्याच्य समस्येमुळे चर्चेत आहे. संस्थेच्या प्राचार्यांकडे मौखिक व लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यामुळे प्रशिक्षणार्थी मुलींमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी ही त्याच आयटीआयमध्ये कार्यरत भांडारपाल यांच्या पत्नीकडे आहे. वसतिगृह गृहपाल बाहेरगावी गेल्याने मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त पुरुष सुरक्षारक्षकावर आहे. वसतिगृहात ५० विद्यार्थिनी राहतात.
आयटीआयमध्ये २५० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात; पण, मागील १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना बोअरवेलद्वारे येणारे दूषित व क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. यातून त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. प्रशिक्षणार्थीकडून पाठपुरावा करूनही प्राचार्यांनी पाण्याची समस्या न सोडवल्यामुळे हाल होत असल्याने वसतिगृहातील काही विद्यार्थिनी स्वगावी गेल्याचे समजते.
५० मुलींना एकच कुलर तर अधीक्षकाकडे दोन
सर्वाधिक उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश आहे. सूर्य आग ओकत असल्याने घरोघरी, कार्यालये येथे एसी, कुलर लावल्या जाात आहे. मात्र, या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या ५० प्रशिक्षणार्थीकरिता एकच कुलर आहे. दुसरीकडे या संस्थेच्या वसाहतीत राहणाऱ्या भांडारपाल व वसतिगृह अधीक्षकाच्या घरीसंस्थेमार्फत दोन कुलर का? असा प्रश्न विचारला जात आहे.