मंगळवारी पंचायतराज समितीचे पथक जिल्हास्थळी दाखल झाल्यानंतर पहिल्या दिवशी जि. प. पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. लेखा परीक्षा पुनर्विलोन अहवालाबाबत सीईओची साक्ष नाेंदविल्यानंतर सकाळी पंचायत समितीनिहाय निवडक गावांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार, समितीने बल्लारपूर-गोंडपिंपरी मार्गावरील गणपूर जि. प. प्राथमिक शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर आक्सापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. दरम्यान, साहित्य तपासणी करत असताना ऑक्सिजन सिलिंडरचा पाईप निघाल्याने समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांना किरकोळ इजा झाली. मात्र, नियोजित दौऱ्यात कुठलाही बदल झाला नाही, असा दावा जि. प. च्या एका अधिकाऱ्याने केला.
दुर्बल घटकांच्या योजनांची तपासणी
जि. प. शाळा व आरोग्य केंद्राच्या पाहणीनंतर गोंडपिपरी येथे पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक झाली. राज्य व केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होते की नाही, याची तपासणी केली. कृषी, आरोग्य, सिंचन व दुर्बल घटकांच्या योजनांची माहिती जाणून घेतली. बैठक आटोपताच पंचायतराज पथक बल्लारपूरकडे रवाना झाले. बल्लारपूर, नागभीड, वरोरा, भद्रावती, कोरपना व सिंदेवाही तालुक्यातील योजनांची माहिती जाणून घेतली.