लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : यावर्षी पावसाने कहर केला असून, अधूनमधून त्याची हजेरी सुरूच आहे. या सततच्या पावसाने पिकांना संवर्धनासाठी पाहिजे तशी उघडीप मिळाली नाही. परिणामी, धानरोपे प्रभावित होऊन विविध रोगाने ग्रासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धान पीक धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. आधीच पाऊस पाण्याने चिंताक्रांत असलेल्या शेतकऱ्यांना आता पिकावरील रोगाने चिंता वाढविली आहे.सध्या धान पीक जोमात असून, गर्भावस्था सुरू आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पनाची आशा होती. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिके रोगग्रस्त झाली आहेत. आता शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.या परिसरातील राजोली, डोंगरगाव, चिखली, गांगलवाडी, मुरमाडी, गोलाभूज, नवेगाव, लोणखैरी, पेटगाव आदी गावांत यावर्षी सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला. त्यामुळे शेतातील बांद्यात अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला नाही. शिवाय सततच्या पावसाने व ढगाळ वातावरणाने धान रोपांवर विपरित परिणाम होऊन पिके रोगग्रस्त झाली आहे. वरवर समाधानकारक दिसणारे पीक आतून खोडकिडीसारख्या घातक रोगाने पोखरून गेले असून, कडाकरपा अळीने मोठ्या प्रमाणावर थैमान मांडले आहे.
फवारणी करूनही उपयोग नाहीशेतकरी वर्ग कीटकनाशकांची फवारणी करून किडीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सततच्या पावसामुळे फवारणीचा काहीही उपयोग होत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. आधीच दुबार, तिबार पेरणीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिकाच्या रोगाचे संकट उभे राहिल्याने तो धास्तावला आहे.