चंद्रपूर : निराधार तसेच वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी प्रशासनाला उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते. यामुळे थकत्या काळात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता निराधार व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासन आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे वृद्धांना दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. राज्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध कलावंत योजना व इतर मानधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र तसेच उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. निराधार योजनेंतर्गत मानधन मिळणारे लाभार्थी हे वयोवृद्ध असतात. त्यांच्या उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसतात. त्यातच उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याकरिता अतिरिक्त खर्च होत होता.
वयोवृद्ध लाभार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास लक्षात घेता मानधन योजनेचा लाभ घेण्याऱ्यांसाठी उत्पन्न प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या वृद्धांचा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निराधार व वृद्ध कलावंत मानधन योजनेत असलेली उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल केली आहे. आता योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पनाचे प्रमाणपत्र सादर न करता पाच वर्षांतून केवळ एकदाच उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.