परराज्यांतून आलेल्यांना प्रतिबंध घाला
सिंदेवाही : तालुक्यात, शहरात परराज्यांतून शेकडोंच्या वर फेरीवाले दाखल झाले आहेत. ही मंडळी चटई, प्लास्टिकच्या वस्तू विकताना दिसत आहेत. कोराेनाच्या तिसऱ्या लाटेची भीती विचारात घेता या फेरीवाल्यांना प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही.
नद्यांच्या नावाची फलके लावावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील इरई, झरपट, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा आदी नद्या वाहतात. परंतु या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे.
वडगावच्या नाल्या केव्हा वाहत्या होणार
चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महानगरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातीस नाल्या मात्र वाहत नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.