भिसी : भिसी हे २० हजार लोकसंख्येचे शहर असून, अप्पर तालुक्याचे ठिकाण आहे; परंतु शहरात अनेक ठिकाणी प्रसाधनगृहेच नसल्याने व्यापारी वर्गाची व नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावांतील नागरिकांना खुल्या जागेवरच लघुशंकेसाठी जावे लागते. भिसीत शनिवारी बाजार भरतो. बाजारासाठी १५-२० गावांतून नागरिक भिसीला येतात. बाजार चौकात कुठेच प्रसाधनगृह नसल्याने बाहेरील नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. जिथे जागा मिळेल, तिथे लघुशंका आटोपली जाते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
वडगावच्या नाल्या केव्हा वाहत्या होणार
चंद्रपूर : शहरालगतचे वडगाव हे गाव आता महानगरपालिकेत समाविष्ट आहे. या गावातीस नाल्या मात्र वाहत नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.
सॅनिटायझरची विक्री घटली
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. अनेकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्के सॅनिटायझरची विक्री घटली असल्याची माहिती आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र, बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
जिवती : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरूपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : कोरपना येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरावस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रुग्णालयात वैद्यकीय कक्ष स्थापन करावे
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना नेमकी कुठे तपासणी करायची व कुठे भरती करायचे याबाबत माहिती नसल्याने वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याची गरज आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कन्हाळगाव येथील वीजपुरवठा खंडित
सावरगाव : नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील विद्युत पुरवठा मागील काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत असल्यामुळे गावातील गरोदर महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती, विद्यार्थी तसेच गावातील समस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, वीज कंपनीने विशेष लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळ योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
नद्यांच्या नावाची फलके लावावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील इरई, झरपट, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा आदी नद्या वाहतात; परंतु या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.