लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : तेलंगणातील रामगुंडम स्थानकानजीक १२ नोव्हेंबरच्या रात्री मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरल्याने बल्लारपूर चेन्नई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे १३ नोव्हेंबर रोजी नागपूरकडून बल्लारपूर मार्गे चेन्नईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अन्य मार्गाने पुढे गेल्यामुळे बल्लारशाह रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली व त्यांना तिकीट रद्द करावी लागली. हा मार्ग २२ तासांनी खुला करण्यात आला. रात्री दक्षिण एक्स्प्रेस बल्लारशाह मार्गे हैदराबादकडे रवाना झाली.
बुधवारी रेल्वेने जाणारे प्रवासी आपल्या नियोजित स्थळाकडे जाण्यास जेव्हा बल्लारशाह रेल्वेस्थानकाकडे आले, तेव्हा त्यांना कळले की नागपूरकडे जाणाऱ्या व चेन्नईकडे जाणाऱ्या सर्व सुपरफास्ट गाड्या रामगुंडकडे मालगाडी घसरल्यामुळे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. यामुळे बल्लारशाह स्थानकावर आलेले रेल्वे प्रवासी वेळेवर काय करावे, त्यांना सुचेनासे झाले. कारण बरेच प्रवासी दिवाळीच्या सुट्यात आले व परत जाण्याचा तयारीत होते तर काही प्रवासी छटपूजेसाठी आले व परतीचा प्रवास करणार होते.
परंतु, नाईलाजाने त्यांना दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी करावी लागली. अलीकडे रुळावरून गाड्या घसरण्याचे सत्रच सुरू आहे. या आठवड्यात बल्लारशाह स्थानकावर वेगवेगळ्या दिवशी दोन गाड्यांचे डब्बे रुळावरून घसरले व लगेच लोहमार्ग सुरळीत करण्यात आला. परंतु अलीकडे रुळावरून गाडीचे चाक घसरण्याचे कारण काय याची चिंता अनेकांना पडली आहे.
मालवाहतूकही खोळंबली बुधवार रोजी बल्लारशाह स्थानकावरून २०१०१.२०१०२ नागपूर सिकंदराबाद, ही गाडी रद्द करण्यात आली होती. याशिवाय दक्षिणेकडून बल्लारशाह मार्गे जाणाऱ्या व बल्लारशाह मार्गे चेन्नईकडे जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेस, यशवंतपूर एक्स्प्रेस, दानापूर सिकंदराबाद, एर्नाकुलम राप्तीसागर एक्स्प्रेस, आंध्र प्रदेश एक्स्प्रेस, अशा ५० च्या जवळपास सुपरफास्ट एक्स्प्रेस बल्लारशाह मार्गे न जाता दुसऱ्या मार्गान वळवण्यात आल्या. याशिवाय मालवाहतूकसुद्धा खोळंबली. बुधवारी रात्रीपर्यंत मार्ग खुला झाल्यामुळे दक्षिण एक्स्प्रेस बल्लारशाह मार्गे सोडण्यात आली.