लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : आधीच अनेक वर्षे ‘आरआय’चे पद रिक्त असल्याने कामे थांबली होती. नागरिकांनी मागणी रेटून धरल्यानंतर जानेवारी महिन्यात हे पद भरण्यात आले. यामुळे आता तरी दिलासा मिळेल, अशी आशा होती. परंतुु, ‘आरआय’ने आपल्या थम्बमध्ये चुकीचा पासवर्ड टाकला आणि तो लाॅक झाला. याची दुरुस्ती करण्याचे काम नायब तहसीलदारांचे आहे. पण, तेही पद रिक्त आहे.
या साऱ्या प्रकारामुळे गेल्या वर्षभरापासून शेकडो लोकांची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
मागास व दुर्गम तालुका म्हणून गोंडपिपरीची ओळख आहे. तालुक्यात लोकप्रतिनिधी नावापुरतेच उरले आहेत. प्रशासनावर कुणाचाच वचक नसल्याची स्थिती आहे. याचा मोठा फटका सामान्यांना बसत आहे. गोंडपिपरीत गेल्या अनेक वर्षांपासून महसूल निरीक्षकाचे पद रिक्त होते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने हे पद भरले नाही. यामुळे शेती व जागेसंबंधीचे अनेकांचे कामकाज थांबले. संतापलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले व मागील महिन्यात महसूल निरीक्षकाचे पद भरण्यात आले. पद भरल्याने आता आपली कामे निकाली लागतील या आशेने नागरिकांत आनंद पसरला. पण, हा आनंद क्षणिकच ठरला. पद स्वीकारताच महसूल निरीक्षकाला थम्ब मिळाला. पासवर्ड टाकून तो ॲक्टिव्ह करावयाचा होता. पण, निरीक्षकाने चुकीचा पासवर्ड टाकला आणि थम्ब लाॅक झाला. लाॅक झालेला थम्ब सुरू करण्यासाठी नायब तहसीलदाराची गरज आहे. पण, गोंडपिपरीत नायब तहसीलदाराचेही पद रिक्त आहे. प्रशासनाच्या अशा पद्धतीच्या चुकीने आपली कामे थांबली आहेत याची माहिती मिळताच नागरिकांत प्रचंड संताप पसरला आहे. आता गोंडपिपरी तहसील कार्यालयात तातडीने नायब तहसीलदाराचे पद भरून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.
बॉक्स
तहसीलदाराचाही थम्ब नाही
के. डी. मेश्राम यांनी चार महिन्यांपूर्वी गोंडपिपरीच्या तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतली. पण, अद्यापही त्यांना थम्ब मिळाला नाही. यामुळे तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण कामे खोळंबली आहेत.