चिमूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत यांनी भेट दिली. या दरम्यान समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने समाजकार्य पारंगत (एमएसडब्ल्यू ) अभ्यासक्रमाकरिता गोंडवाना विद्यापिठात प्रवेश क्षमता वाढविण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले.
विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी असल्याने अनेक विद्यार्थी आवड असूनही या अभ्यासक्रमापासून वंचित असतात. त्यामुळे प्रवेश क्षमता वाढवावी, तसेच प्रवेश कोटा वाढवावा, विद्यापीठात समाजकार्य अभ्यासक्रम विभाग स्थापन करावा, समाजकार्य अभ्यासक्रमाकरिता समान प्रवेश शुल्क आकारावे, तसेच हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना, समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाचे जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार, सिनेट सदस्य संदीप लांजेवार, सचिव राहुल मडावी, गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज बावनवाडे इत्यादी उपस्थित होते.