चंद्रपूर : पोलीस पाटील हे गावासाठी महत्त्वाचे पद आहे. वर्षभरातील सण, उत्सव व गावामध्ये येणाऱ्या अनोळखी मुसाफिरांची नोंद ठेवणे, गावातील तंट्यांचा निपटारा करणे, अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून संबंधित ठाण्याला माहिती देणे, अशा अनेक बाबींमध्ये पोलीस पाटलांना लक्ष घालावे लागते. सध्या तर कोरोना संकटामुळे त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या आहेत. परंतु अल्प मानधन मिळत असल्याने त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातही मानधन नियमित मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस पाटलांचे मानधन वाढवून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मानधनात वाढ करण्याची मागणी पोलीस पाटलांनी केली आहे.