चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59वा वर्धापन दिवस चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा संदेश देताना राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.सकाळी 8 वाजता पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट, कोळसा, कागद व वीज निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांना कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केले आहे. राज्याला ऊर्जा पुरविणारा हा जिल्हा असून यापुढेही राज्याच्या उन्नतीत प्रत्येक नागरिकाचा वाटा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातल्या श्रमिक शक्तीला यावेळी त्यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना देखील त्यांनी यावेळी अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशी देखील संवाद साधला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कानावत यांनी आज पोलीस दलाच्या पथकाचे संचलन केले. महाराष्ट्र दिनी आज महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या देखील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला. ब्रह्मपुरी तालुक्यातील तलाठी आकाश भाकरे यांना यावेळी जिल्ह्यातील आदर्श तलाठी म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या मुख्य समारोहाला आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी ध्वजारोहणाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोटूसिंग व मंगला आसुटकर यांनी केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.