घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
बस अभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे. तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचा पर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोईचे होणार आहे.
मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
फाटकाजवळील कचरा हटवावा
गडचांदूर : येथील रेल्वे फाटक जवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जातो. पावसाळा असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी
मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावे, अशी मागणी आहे.
जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा करण्याची मागणी
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा न झाल्याने नाल्या सांडपाण्याने तुंबल्या आहे. काही भागात नालीचे पाणी बाहेर वाहत असून ते लोकांच्या घरात जात आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन नाल्यांचा उपसा करण्याची मागणी होत आहे.
फुटलेल्या घंटागाडीमुळे रस्त्यावर कचरा
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र बहुतांश घंटागाड्या फुटलेल्या असल्याने रस्त्यावर कचरा पडत असतो.
पुलावर कठडे बसविण्याची मागणी
कोरपना : जिल्ह्यातील अनेक नद्ये, तलाव येथील पुलावर कठडे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात अनेकजण पडून मृत्युमुखी होण्याच्या घटना घडत आहेत.
वढोलीत रस्त्याची दुरवस्था
वढोली : मध्यवर्ती बँक ते ऋषी पाल यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे एकाच पावसामुळे तीनतेरा वाजले असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात अनेक गल्लीत काँक्रीट रस्ते झाले असून, गेल्या १० वर्षांपासून वार्ड क्रमांक दोनमध्ये येणाऱ्या बँक ते ऋषी पाल यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अजून मंजूर झाला नाही.
सौर ऊर्जेचे कुंपण अनुदानावर द्यावे
चिमूर : शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहेत. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करत आहेत.