पाणी संचय करण्याची गरज
चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी राबविल्याने मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.
मोबाईल दुरुस्तीसाठी गर्दी
चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोअरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे याच स्टोअरमध्ये अनेक कंपन्यांच्या मोबाईलचेही स्टोअर असल्याने त्या कंपन्यांचे ग्राहकसुद्धा गर्दी करतात. त्यामुळे आणखी एक एमआय स्टोअर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
चंद्रपूर : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांमुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे.
जुनोना रस्त्यावर खड्डे
चंद्रपूर : चंद्रपूर - जुनोना मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून पोंभुर्णा, चिचपल्ली आदी गावांकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, या मार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
प्लास्टिकचा वापर वाढला
चंद्रपूर : जिल्ह्यात बहुतांश शहरांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. विशेषत: व्यावसायिक ग्राहकांना बिनद्दिकतपणे ग्राहकांना पिशव्या देत आहेत. पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय संकटात
चंद्रपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसायाकडे धाव घेतली. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सध्या ऑटो चालकांना पडला आहे.
रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी
चंद्रपूर : बाबूपेठमधील अनेक रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा होत आहे. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही.
पाणी पुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असूनही चंद्रपूर शहरातील काही भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारीक होत असल्याने पाणीच मिळत नाही.
पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने ही रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.