पाणी संचय करण्याची गरज
चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र तरीसुद्धा रेन व्हॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेनवाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्या मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.
मोबाईल दुरुस्तीसाठी गर्दी
चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे याच स्टोरमध्ये अनेक कंपन्याचे मोबाईलचेही स्टोर असल्याने त्या कंपनीचे ग्राहकसुद्धा गर्दी करतात. त्यामुळे पुन्हा एक एमआय स्टोर देण्यात यावे, अशी मागणी आहे.
जुनोना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
चंद्रपूर : चंद्रपूर-जुनोना मार्गावर खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून पोंभूर्णा, चिचपल्ली आदी गावांकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र या मार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
प्लास्टिकचा वापर वाढला
चंद्रपूर : जिल्ह्यात बहुतांश शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. विशेषत: व्यावसायिक ग्राहकांना बिनदीक्कतपणे ग्राहकांना पिशव्या देत आहेत. पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय संकटात
चंद्रपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसायाकडे धाव घेतली. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे.त्यामुळे घर खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सध्या ऑटोचालकांना पडला आहे.
पाणी पुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असूनही चंद्रपूर शहरातील काही भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारीक होत असल्याने पाणीच मिळत नाही.
पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही नद्यांच्या पुलावरील कठडे तुटले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्याचे त्वरित बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.
वेगवान वाहनांवर कारवाई करा
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटरसायकलवर स्वार होवून सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागते. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यात्रास्थळांना सुविधेचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यात चिमूर, कोरपना, राजुरा, सिंदेवाही, गोंडपिपरी आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी यात्रा भरते. मात्र येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्ह्यातील प्रत्येक यात्रास्थळांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.