जयंत जेनेकर कोरपनायावर्षी प्रथमच कोरपना येथे सी.सी. आय मार्फत कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे तेलंगणात विक्रीस जाणाऱ्या कापसाला तालुक्यातच बाजारपेठ उपलब्ध झाली. येथील खरेदी केंद्रावर कापसाची आवक वाढली असून जागेअभावी खरेदीला वारंवार ‘ब्रेक’ द्यावे लागत आहे. दिवसभरात १५०० ते २००० क्विंटल मालाची खरेदी केली जात असून संकलन केंद्रावर कापूस टाकण्यासाठी जागा होत नसल्याने खरेदीत वारंवार ब्रेक घ्यावा लागत आहे. यावर्षी पणन महासंघातर्फे कोरपना येथे खरेदी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे सी.सी. आय. मार्फत कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. ही खरेदी ७ नोव्हेंबरपासून येथील संकलन केंद्रावर सुरू आहे. यामध्ये आजापर्यंत २५ हजार ७०७ क्विंटलची खरेदी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात जागेअभावी ३० पैकी १९ दिवसच खरेदी आजपर्यंत होऊ शकली आहे. उर्वरीत ११ दिवस खरेदीला ब्रेक देण्यात आला. कोरपना तालुका हा शेतीप्रधान असल्याने या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथे दोन खासगी व एक सहकारी जिनिंग आहे. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच सी.सी.आय.मार्फत कापूस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तेलगंणात विक्रीसाठी जाणारा कापूस कोरपना येथेच शेतकऱ्यांनी विक्रीला आणला. याचा थेट लाभ येथील संकलन केंद्राला झाल्याने कापसाची आवक वाढली आहे. शिवाय परिसरातील वणी, आबई, येथील सी.सी.आय. मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या संकलन केंद्राला लाभ झाला आहे.येथील संकलन केंद्रावर १६० रुईगाठी काढण्याची एक दिवसाची क्षमता आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या व जागेच्या अभावामुळे खरेदीला वारंवार ब्रेक द्यावे लागत आहे. संकलन केंद्रावर बैलबंड्यानी कापूस मोठ्या प्रमाणात आला आहे. मात्र, त्यांना खरेदी बंद अभावी ताटकळत राहावे लागत आहे. कापसाची आवक वाढल्याने केंद्रावर जागेची अडचण निर्माण होत आहे. केंद्र शासनाची आधारभूत किंमत ४०५० शेवटपर्यंत राहणार आहे. (वार्ताहर)
कोरपना कापूस संकलन केंद्रावर आवक वाढली
By admin | Published: December 29, 2014 1:10 AM