चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. मात्र ही पद्धत डोकेदुखी ठरत आहे. बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी प्रतीक्षालय उभारण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी केली आहे.
मागील काही दिवसापासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशात ग्रामीण भागातील रुग्ण शहरी भागात येत आहेत. या सर्व रुग्णांची नोंदणी आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. एक पोर्टल काढून रुग्णांनी नोंदणी केल्यावरच बेड मिळतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मात्र गंभीर रुग्णांना भटकावे लागत आहे. त्यामुळे या रुग्णांना नंबर येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच ग्रामीण रुग्णांचे बेहाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी प्रतीक्षालय उभारून तिथेच ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन फ्लो-मीटर तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.