राजुरा : कापूस पिकावर गेल्या तीन वर्षांपासून बोंडअळी येऊन पिकाचे नुकसान झाले आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी वैतागला आहे. त्यातच कोरोनाने थैमान घातले आहे. शेतकरी कुटुंबातील कर्तेपुरुष मरण पावले. शेतकरी संकटात सापडला. अशा परिस्थितीत रासायनिक खताची केलेली दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे, असा आरोप आपचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे यांनी केला आहे.
खताच्या किमती दुपटीने वाढवून करोडो रुपये कमावून शेतकऱ्यांना भिकेला लावायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांची भीक देऊन त्या भिकेला सन्मान हे नाव द्यायचे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढणार आहे. शेतकऱ्यांचा सरकारने विचार करून खताची दरवाढ थांबवावी, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीचे राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संघटन प्रमुख परमजित सिंग झगडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. या वेळी आपचे रोशन येवले, मिलिंद गड्मवार, स्वप्निल कोहपरे, पवन ताकसांडे, अरविंद वांढरे, मारोती पुरी, गोविंद गोरे, सुनील राठोड, प्रतीक डाखरे, ऋषी वासेकर उपस्थित होते.