कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मानव विकासच्या, तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी असणाऱ्या अनेक बसफेऱ्या बंद होत्या, परंतु मागील महिन्यात माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार जिल्ह्यात मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील आगारात असलेल्या एकूण ५४ मुक्कामी बसपैकी ४० बस सुरू करण्यात आल्या आहेत. चिमूर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मानव विकासच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जसजशी प्रवाशांची मागणी वाढणार, असे तसतशा बसफेऱ्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली.
बॉक्स
ग्रामीण भागातील गाळीतही जागा मिळेना
बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अद्यापही पूर्वीप्रमाणे बस सुरू नाही. ग्रामीण भागात मोजक्याच बसफेऱ्या धावत आहेत. सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एक किंवा दोनच बस धावत आहेत. परिणामी, या बसमध्ये प्रवाशांना पाय ठेवण्यासाठीही जागा नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या बंद
पूर्वी आगारातून मोठ्या प्रमाणात बसफेऱ्या धावत होत्या. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या, तरी सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत. चंद्रपूरवरून गडचिरोली जाण्यासाठी पूर्वी ९.१५ वा.ची शेवटची बस होती. मात्र, कोरोनामुळे ही बस बंद करण्यात आली आहे. आता ७ वाजतानंतरही गडचिरोलीसाठी एकही बस नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सायंकाळी ८.३०, रात्री ९.१५ वाजताची गडचिरोलीसाठी बसफेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
बॉक्स
१४ मुक्कामी गाड्यांचे काय
पूर्वी जिल्ह्यातून चारही आगारातून ५४ मुक्कामी बसफेऱ्या धावत होत्या. मात्र, कोरोनाने मुक्कामी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता माध्यमिक शाळा सुरू झाल्याने ४० मुक्कामी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही १४ मुक्कामी गाड्या बंद आहेत. प्रवाशांची मागणी वाढल्यास या बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
-------
बस सुरू झाल्या आहेत. मात्र, पूर्वीच्या तुलनेत कमी बस आहेत. त्यामुळे प्रवास करण्यास मोठी अडचण जाते. सर्वच सुरळीत झाले आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्वीसारख्याच बसफेऱ्या सुरू कराव्या.
अजित गेडाम, प्रवासी.
-----
चंद्रपूरवरून पूर्वी गडचिरोली जाण्यासाठी शेवटची बस ९.१५ वाजताची होती. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी काम करायला येणाऱ्यांना काम आटोपून गावाला जाण्यास सोईचे होते. मात्र, आता ती बस बंद केली असून, सायंकाळी ७ वाजताची शेवटची बस आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बसफेरी सुरू करण्याची मागणी आहे.
- अमित दुधे, प्रवासी.
------
मुक्कामी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अनेक ठिकाणच्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे सकाळच्या सुमारास शहरात जायचे असल्यास मोठी अडचण होत आहे. आता व्यवहार सुरळीत झाले असल्याने शहरात कामासाठी जावे लागते. त्यामुळे सर्वच बस सुरू करण्यात याव्या.
- अमोल गेडाम, प्रवासी.