सावली : शहरात डेंग्यूसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. मलेरिया, हिवताप, जलजन्य यासारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आरोग्य विभागाचे फवारणी करण्याबाबतचे पत्र नगरपंचायतला मागील तीन आठवड्यांपूर्वीच देण्यात आले. संबंधित प्रशासनाने नगरातील काही प्रभागात डास प्रतिबंध फवारणी केली असली तरी अनेक प्रभागात फवारणी केली नसल्याचे दिसून येत आहे. तर नगरपंचायतकडे डास प्रतिबंधक औषधे उपलब्ध नसल्याचेही बोलले जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे जलजन्य आजार, हिवताप, डेंग्यू, मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजाराची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात आठवड्यातून दोन दिवस डास प्रतिबंधक फवारणी करणे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यात काही रुग्णांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सावली नगराची दाट वस्ती व लोकसंख्या लक्षात घेता डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कोट
जलजन्य आजार, हिवताप, मलेरिया, यासारख्या आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात भरती होत आहेत. त्यामुळे आठवड्यात दोनदा डास प्रतिबंधक फवारणी करणे गरजेचे आहे.
डॉ. भीमराव धुर्वे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, सावली