मोटरसायकल रॅली : जिल्ह्यात विविध ठिकाणी विदर्भवाद्यांचे आंदोलनचंद्रपूर : वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवाद्यांचे मागील अनेक महिन्यांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. प्रवचने, व्याख्यान, आंदोलने केली जात आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अनेक तालुक्यात रविवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या मागणीसाठी ध्वजारोहण करून शासनाचे लक्ष वेधले. चंद्रपुरात जनता महाविद्यालयासमोर विदर्भाचा प्रतिकात्मक ध्वज फडकाविण्यात आला. यासोबतच राजुरा, वरोरा व गोंडपिपरी येथे मोटारसायकल रॅलीसह मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातील मूल येथे या मागणीच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळल्या प्रकरणी युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार व संतोष रामटेके यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली व अन्य तालुक्यातील वेगळ्या विदर्भासाठी ध्वजारोहण करण्यात आले.चंद्रपुरात सकाळी ८.३० वाजता जनता महाविद्यालयाच्या पटांगणात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी जिल्हाभरातून उपस्थित झालेल्या विदर्भवाद्यांना स्वतंत्र विदर्भ राज्याची शपथ दिली. यावेळी विदर्भ राज्य आघाडीचे बंडू धोत्रे, अॅड. विजय मोगरे, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. प्रतिभा जीवतोडे, प्राचार्य प्रभू चोथवे, डॉ. एम. सुभाष, डॉ. इसादास भडके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सचिव केशव जेनेकर, भाऊराव निखाडे, रत्नमाला बावणे आदी उपस्थित होते.राजुरा येथील नेहरू चौकात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. ताराचंद लांडे यांच्या हस्ते वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला.यावेळी बंडू माणूसमारे, दिगंबर डोहे आदी उपस्थित होते. राजुरा येथे भूमिपूत्र युवा संघटनेच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर मौलाना आझाद चौकात विदर्भाचे प्रतिकात्मक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हरिदास झाडे, लता ठाकरे, भावना ताठे, बापुराव मडावी, नितीन आंबडकर, संतोष देरकर, किसन मुसळे आदी उपस्थित होते.सावली येथील पत्रकार भवनासमोर विदर्भवाद्यांकडून विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी बहुसंख्य विदर्भवादी नागरिक उपस्थित होते. गोंडपिपरी येथे भूमिपुत्र युवा संघटनेच्या वतीने मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य अमर बोडलावार, पुरुषोत्तम वाघ, इंद्रपाल धुडसे, संजय वडस्कर आदी उपस्थित होते. ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद चौका विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी अॅड. गोविंद भेंडारकर, सुधीर सेलोकर, माजी आमदार उध्दवराव सिंगाडे, सुधदेव प्रधान, अशोक रामटेके, प्राचार्य देवीदास जगनाडे आदी उपस्थित होते. मूल येथील गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती व युवक बिरादरी संघटनेच्या वतीने विदर्भाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विदर्भवाद्यांनी १ मे हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळला. या आंदोलनादरम्यान युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडू येनप्रेड्डीवार आणि संतोष रामटेके यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. (शहर प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रतिकात्मक ध्वजारोहण
By admin | Published: May 02, 2016 12:41 AM