चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातर्फे नुकतीच ‘भारतीय संस्कृतीत वृक्ष आणि प्राणी संवर्धनाचे स्थान’ या विषयावर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात कार्यरत विद्यावाचस्पती प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे, प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा.स्वप्नील माधमशेट्टीवार, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी इत्यादी उपस्थित होते.प्रास्ताविकपर भाषणातून प्राचार्य डॉ. जे.ए. शेख यांनी या व्याख्यानाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विषद केली. तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीला अनुसरुन अशा प्रकारच्या व्याख्यानांचे औचित्यही सांगितले. डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. भारतीय संस्कृती प्राचीन व जगात सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगतानाच आज आपण ज्याला विज्ञानाचे शोध म्हणून मिरवतो, त्या सर्व संकल्पना मूलत: आपल्याच संस्कृतीत सांगितल्या आहेत, असे डॉ. स्वानंद पुंड यांनी विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांपुढे मांडले. अणूतील प्रोट्रॉन इलेक्ट्रॉन व न्युट्रॉन हा शोध लागन्यापूर्वीच आपल्याकडे त्यांचेच सर्व गुणधर्म असणारे सत्व- रज- तम याचा विचार केला गेला. प्राणिशास्त्रात शिकविल्या जाणारा उत्क्रांतीवाद आणि हिंदू संस्कृतीत सांगितलेले विष्णूचे दशावतार यांची सुरेख सांगड त्यांनी आपल्या व्याख्यानातून घातली. एकत्र कुटुंबपद्धती सणावारांच्या निमित्ताने त्या-त्या दिवशी असणारं वृक्षाचं आणि प्राण्यांचं महत्व त्यामुळे आपसुकच साधला जाणारा पर्यावरणाचा समतोल या सर्वाकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. संचालन भाग्यश्री तांबोळी हिने तर आभार प्रा. संदेश पाथर्डे यांनी मानले. प्राणीशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदेश पाथर्डे, प्रा. अजय बेले, प्रा. भारती दीक्षित, प्रा. तेलंग, प्रमोद नारळे, गुरुदास शेंडे, राजेश इंगोले यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
भारतीय संस्कृती जगात अतिप्राचीन, सर्वश्रेष्ठ आणि विज्ञानाधिष्ठित
By admin | Published: August 19, 2014 11:37 PM