चंद्रपूर : गोंडपिपरी जवळील विहीरगावजवळ रविवारी दुपारच्या वेळी एका नागाने चक्क घोणस सापाला गिळल्याची घटना घडली. दुर्मीळ असलेली घटना अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केली. बघता बघता येथे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर सर्पमित्राला बोलविण्यात आले. यामध्ये घोणस सापाचा मृत्यू झाला तर नागाला वाचविण्यात सर्पमित्राला यश आले आहे.
मागील काही दिवसांपासून गोंडपिपरी येथे रस्त्याचे काम सुरु आहे. विहिरगाव येथील देवाजी चौधरी यांच्या घरासमोरील परिसरात एका सापाला दुसरा साप गिळत असल्याचे नागरिकांना दिसले. याची माहिती गावात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली. याचवेळी ठाणेदार जीवन राजगुरू काही कामानिमित्त येथे आले. त्यांनीही हा प्रसंग बघितला. यानंतर सर्पमित्र दीपक वांढरे यांना पाचारण केले. वांढरे यांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. यावेळी नागाच्या तावडीतून घोणस सापाला बाहेर काढण्यात आले पण, घोणस सापाचा मृत्यू झाला. तर नागाला जीवदान देण्यात आले. साधारणत: नाग साडेपाच तर घोणस साडेतीन फुटाचा असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.