दत्तात्रय दलाल
ब्रह्मपुरी, : मागील ३५ ते ४० वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी तथा तालुक्यातील जनतेने प्रशासनाकडे लावून धरली; मात्र आजतागायत जिल्हा निर्मिती करण्यात आली नाही. विदर्भवाद्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तर ही मागणी करणाऱ्या तसेच सत्तेतील राजकारण्यांचे जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर ब्रह्मपुरी तालुका असून तालुक्याचा परीघ फार मोठा आहे. शासकीय कामानिमित्त चंद्रपूर गाठावे लागते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विद्येचे माहेरघर, वैद्यकीय सुविधा असलेले शहर म्हणून ब्रह्मपुरीची महाराष्ट्रात ओळख आहे. वैनगंगा नदीने चारही बाजूने वेढले असल्याने येथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नेहमीच करण्यात आली.
वेगळा विदर्भ करण्यासह ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी लावून धरली होती. सन १९८२ ला ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती होणार म्हणून आकाशवाणीवर जाहीर करण्यात आले; मात्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात येत आहे; परंतु जिल्हा निर्मितीच्या विषयावर अनेकांनी केवळ राजकारण केल्याचे दिसून येते.
ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील जिल्हा निर्मितीच्या जनसामान्यांच्या भावना त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेला नेहमी चंद्रपूर गाठून आपले शासकीय काम करावे लागते. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा विषय विधिमंडळात मांडावा व ठराव पारीत करून जिल्हा निर्मिती करावी, अशी अपेक्षा व मागणी जनसामान्य करीत आहेत.
कोट
उपजिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे देण्यात आले. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे कार्यालय नगभीड किंवा ब्रह्मपुरी येथेच व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जेव्हा कधी जिल्हा निर्मितीचा विषय शासन स्तरावर मांडला जाईल. तेव्हा ब्रह्मपुरी सर्व दृष्टीने योग्य असल्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करण्यात यावा.
- ॲड. गोविंदराव भेंडारकर
बॉक्स
ब्रह्मपुरीतील विकासकामांची वाटचाल जिल्हा निर्मितीकडे
मधल्या काळात चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात आली होती. ब्रह्मपुरी मुख्य महामार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. ब्रह्मपुरी येथे नव्याने १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, नगर परिषदेची नवी इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ही विकासकामे जिल्हा निर्मिती हेच धेय ठेवून करण्यात येत असल्याचे दिसून येते.