लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोटारवाहन कायद्यातील नव्या नियमाचा आणि दहा पट दंडाचा पालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींकडील दुचाकी वाहने काढून घेत त्यांच्या हाती चक्क सायकली दिल्या आहेत. शहरातील शिकवणी वर्गासमोर दुचाकी घेऊन येणारे काही विद्यार्थी आता सायकलने येत असून वर्गासमोर सायकलच्या रांगा लागत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत.मोटर वाहन कायद्यातील दुरुस्ती अद्याप राज्यात लागू झाली नाही. मात्र सोशल मिडियावरुन याबाबत जनजागृती सुरु आहे. याचा चांगलाच धसका काही पालकांनी घेतल्याचे दिसत आहे. वाहतुकीचेनियम मोडल्यास दंडाच्या रक्कमेत तब्बल दहा पट वाढ होत आहे. त्यातही अल्पवयीन मुलामुंलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. अनेक पालक आठव्या वर्गात मुलगा-मुलगी गेला की, त्याला दुचाकी देतात. शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गालाही ही अल्पवयीन मुले दुचाकीने भरधाव जातात. अनेकदा पोलिसांनी याविरुद्ध मोहीमही उघडली. अनेक पालकांना दंडही झाला, परंतु आतापर्यंत असलेला नाममात्र दंड म्हणून पालक मोकळे होत होते. कुणी मनावर घेत नव्हते. मुलांच्या हट्टापुढे पालकांचेही चालत नव्हते. त्यामुळे मुले घरुन पालकांची दुचाकी घेऊन शिकवणी वर्गासह शहरातही भटकत होते. परंतु आता नवीन वाहन कायदा अस्तित्वात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात दंड असल्याने पालकांनी मुलांकडील दुचाकीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेणे सुरु केले आहेत. मुलाने कितीही आग्रह केला तरी २५ हजार रुपये दंडाचा धसका घेत पालक सध्या तरी दुचाकी देतांना विचार करताना दिसत आहे. परिणामी शाळा महाविद्यालयात आणि शिकवणी वर्गासमोरही आता सायकलचा पायडल मारत येणारे विद्यार्थी दिसत आहेत. स्टँडमधील दुचाकीची जागा हळुहळू सायकलनी घेतली आहे.जनजागृतीने जे इक्या वर्षांत झाले नाही ते केवळ दंड वाढताच शक्य होताना दिसत आहेत.श्रीमंत पालकांचे दुर्लक्षपरिवहन विभागाने अल्पवयीन वाहनचालकांवर मोठ्या दंडाची तरतूद केल्याने काही पालकांनी धसका घेतला असला तरी काही श्रीमंत पालक मात्र बिनधास्त पाल्याकडे दुचाकी देत आहेत.वाहतूक पोलिसांचे काम हलकेदुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींविरुद्ध वाहतूक शाखेने आतापर्यंत अनेकदा मोहिम उघडली. शाळा महाविद्यालयासमोर उभे राहून मुलांच्या हाती चालन दिले. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र दहा पट दंडाची तरतूद होताच काही पालकांनी स्वत: मुलांच्या दुचाकी काढून घेतल्या असून पोलिसांचे काम हलके होणार आहे.
शिकवणी वर्गासमोर सायकलची गर्दीशहरातील विविध ठिकाणी शिकवणी वर्गाचे पेव फूटले आहे. पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसतानाही शिकवणी वर्ग सुरु आहेत. या ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली आपल्या दुचाकी भर रस्त्यावर उभे करतात. त्यामुळे वातहुकीचा खोळंबा होतो. शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळी मोठा गोंधळ उडत होता. आधीच वाहन चालविणे येत नाही आणि त्यात गर्दी अशोवेळी अपघाताची भीतीही कायम आहे. मात्र सध्या शहरातील काही शिकवणी वर्गासमोरील दुचाकीची गर्दी ओसरली असून त्या ठिकाणी आता सायकली दिसू लागल्या आहेत.