चंद्रपूर : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढली. विवाहानंतर स्त्रीचे वय ३० वर्षांच्या आत असल्यास दोन वर्षांच्या आत मातृत्व प्राप्त व्हावे. मात्र त्याहीपेक्षा जास्त वय असेल तर एक वर्षाच्या आत मातृत्व मिळाले पाहिजे. या कालावधीत आई बनू शकली नाही तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन चंद्रपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलिमा मुळे यांनी शनिवारी जागतिक इनफर्टिलिटी डे निमित्त केले.
डॉ. नीलिमा मुळे म्हणाल्या, स्त्रीला तिचे शिक्षण व व्यवसाय इतर महत्त्वाकांक्षा, करिअर मनासारखा जॉब मिळविणे आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आज बराच काळ लागत आहे, त्यामुळे लग्न उशिरा होऊ लागले. आजची स्त्री स्वतंत्र व कमावती होऊ लागली. समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती रूढ झाल्यामुळे पूर्वी स्त्रीला दुय्यम दर्जा मिळत होता. पण आता ही परिस्थिती बदलत आहे. पूर्वीच्या काळी स्त्रीचा जन्म म्हणजे शापित जन्म समजला जात असे लग्नानंतर तिला लगेच मूल झाले नाही तर घरची मंडळी विशेष करून तिची सासू तिला सासुरवास करीत असे. वांझोटी म्हणून हिणवत असे. आज बदल होत असल्याने महिलांच्या आत्मसन्मानाला बळ मिळत असल्याचेही डॉ. मुळे यांनी नमुद केले.
वैद्यकीय विज्ञानावर विश्वास ठेवा
एखाद्या स्त्रीला मूल न होणे हा सर्वस्वी १०० टक्के तिचा दोष समजल्या जाईल. पतीचा काहीच दोष नाही असे वाटत असे. परंतु आज विज्ञानाने दाखवून दिले की, गर्भधारणेसाठी दोघांचाही स्त्री व पुरुष याचा ५०-५० टक्के सहभाग असतो. विज्ञानाने मोठी प्रगती केल्याने सहज माता होता येऊ शकते. काही कारणास्तव बाळ झाले नाही तर सरोगेट मदर अथवा मूल दत्तक घेणे हाही पर्याय आहे. यामुळे एका मुलाला किंवा मुलीला कुटुंब मिळते.
लाईफ स्टाइल बदलवा
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे लाईफ स्टाइल होय. व्यायामाचा अभाव, आळशीपणा, फास्ट फूड, खूप वेळ सोशल मीडियाचा उपयोग आणि टीव्ही मोबाईल पाहण्यात जास्त वेळ घालवणे, आदी कारणांमुळे अतिशय लठ्ठपणा हा विकार वाढू लागला. लग्न झालेल्या जोडप्याने वेळीच तपासणी करावी. विज्ञानाने खूप प्रगती केल्यामुळे स्त्रीचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मात्र, त्यासाठी लाईफ स्टाइल बदलविली पाहिजे, असा सल्ला डॉ. मुळे यांनी दिला.
युवतींमध्ये वाढला अतिस्थूलपणा
स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ३८ वर्षांपासून सेवा देताना मला असे निदर्शनास आले की युवतींमध्ये आता अतिस्थूलपणाची समस्या उग्र रूप धारण करीत आहेत. त्यामुळे स्टर्लिटी म्हणजे वांझपणाही वाढू लागल्याचे निरीक्षण डॉ. नीलिमा मुळे यांनी नोंदविले.