दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी तर खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान झाले, तर अतिपावसामुळे कपाशीवर बोंडअळी आली. त्यामुळे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. दरम्यान, धान पिकाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रब्बीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे सुरू केले. हरभरा, गहू आदी पिकांची लागवड केली. मात्र हे पिकही सद्यस्थितीत बिकट अवस्थेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हरभरा पेरणीवर यावर्षी शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. सध्या हरभरा पीक चांगले बहरले असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करीत आहेत. मात्र अळी आटोक्यात येत नसल्याने हे पिकही हातून जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीचे औषध पुरवावे, अशी मागणी केली जात आहे.
हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:24 AM