वाहतूककोंडीकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : प्रशासनाने दुपारी ४ वाजेपर्यंत व्यावसायिकांना शिथिलता देताच बाजारामध्ये मोठी गर्दी बघायला मिळत आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूककोंडी होत आहे. त्यातच काही रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मेस संचालकांचे आर्थिक नुकसान
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण तसेच काही व्यवसाय अजूनही ठप्पच आहेत. त्यामुळे मेस संचालकांचे मोठे नुकसान होत असून त्यांना ग्राहकच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यांना आता शाळा, महाविद्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
मजूर संस्था आल्या डबघाईस
चंद्रपूर : बेरोजगार मजूर संस्थांना शासकीय पातळीवर कामच मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तरी या संस्थांना काम देऊन दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, काम मिळेल या आशेने जिल्ह्यातील मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी या संस्थांकडे नोंदणीही केली आहे.
भाजीपाला विकणाऱ्यांची संख्या वाढली
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रोजगार गमवावा लागला. यातूनही काही जण मार्ग काढत आहेत. कमी पैशामध्ये सुरू होणारा भाजीपाला व्यवसाय सुरू करून काहींनी उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत भाजीपाला व्यावसायिकांची संख्या वाढली आहे.
खासगी शिकवणी क्लास सुरू करा
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे खासगी शिकवणी क्लास पूर्णपणे बंद आहे. परिणामी शिकवणी वर्ग संचालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवणीपासून मुकावे लागले आहे. दरम्यान, संचालकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन क्लास सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
व्यावसायिकांचे हाल सुरूच
चंद्रपूर : कोरोना नियमात सध्या शिथिलता देण्यात आली असली तरी व्यावसायिकांची मोठी फजिती होत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंतच व्यवसाय करावा लागत असून पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकही येत नाहीत.
सायंकाळी फिरणाऱ्यांची गर्दी वाढली
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी काही नागरिक मोठ्या संख्येने सायंकाळी फिरण्यासाठी निघत आहेत.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : तालुक्यातील बहुतांश गावांत इंटरनेट सेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
व्यायाम साहित्याची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील काही परिसरामध्ये लावण्यात आलेल्या व्यायाम साहित्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदर साहित्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पांदण रस्त्याची समस्या सोडवा
चंद्रपूर : तालुक्यातील काही पांदण रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो. काहींनी या रस्त्यांवर अतिक्रमण केले. शेतीची मशागत व बांधबंदिस्ती करताना झाडे-झुडपे वाढली. अतिक्रमण केल्याने पांदण रस्ते गायब झाले. त्यामुळे पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.