ब्रह्मपुरी तालुका धानपिकाचे कोठार आहे. येथील धानपिके हलकी व भारी, अशा दोन्ही प्रकारची असतात. सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात पाऊस असमाधानकारक आहे; परंतु गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने काहीअंशी शेतीला पाण्याचा फायदा झाला आहे; पण हे पाणी दूषित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे; पण कृषी विभागाने यावर काहीच उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांना स्वयंभू निर्णय घ्यावा लागत आहे. गावोगावी कृषीमित्र आहेत व कृषीगट तयार केले आहेत; पण इतर शेतकऱ्यांना लाभ न देता ते कृषी गटांनाच लाभ देत आहेत. एका गटात पंधरा ते सोळा शेतकऱ्यांचा समावेश असतो; पण गावात अन्य शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधून अन्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. एकरी या रोगावर फवारणी करण्यासाठी कमीत कमी १५०० रुपयांच्या वर खर्च येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
कोट
कृषी अधिकाऱ्याने सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करून कृषीमित्राच्या साहाय्याने औषधीचे वाटप करण्यात यावे.
-मोरेश्वर अलोने,
शेतकरी व माजी सरपंच, भालेश्वर