दत्तात्रय दलालब्रम्हपुरी : देशात पेट्रोल, डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. अकरा दिवसात तब्बल अकरा रुपयांनी पेट्रोलचे तर डिझेलचे दरही त्याच प्रमाणात वाढले आहेत. परिणामी दळणवळणचा खर्च वाढला आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तुंसह इतर वस्तूंचेही दर वाढले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अल्प मिळकत आणि खर्च आवाक्याबाहेर असल्याने प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.तांत्रिक युगात मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी, इंधन दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात मागील पंधरवड्यात वाढ झाली आहे. तब्बल अकरा दिवसात पेट्रोल अकरा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे दळणवळण खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, दररोज लागणारा भाजीपाला, किराणासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत आपसूकच वाढ झाली आहे. तर कापड, पोलाद, सिमेंट आदी प्रत्येक वस्तूंच्या किमतीतही कमालीची वाढ झाल्याने आता घर बांधणेही आवाक्याबाहेर झाले आहे. प्रवास खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना वाढलेल्या महागाईत प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न पडला आहे.
मजुरीत वाढ अत्यल्प, दैनंदिन खर्च परवडेनाविटाभट्टी, बांधकाम, विविध आस्थापनातील कामगार आदी मजुरांची वाढत्या महागाईने काही प्रमाणात मजुरी वाढली; परंतु दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हा पैसा कमी पडतो. त्यामुळे कष्ट करूनही पदरी पैसा शिल्लक राहत नाही. मजुरीत काही प्रमाणात वाढ झाली; मात्र दैनंदिन खर्च परवडत नाही. सध्या लग्न समारंभाची धूम आहे; मात्र महागाईत उपवरांचे लग्न कसे पार पाडावे, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.