मार्च ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ तिखट मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. याच कालावधीत लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करण्यात येतो. त्यामुळे या कालावधीत गृहिणी मिरची, धने, जिरे, खसखस, खोबरे, मेथी, हळद, लवंग आदी गरम मसालाजन्य पदार्थांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करतात. मात्र यंदा मिरचीचे व धन्याचे उत्पादन कमी झाल्याने तसेच कोरोनामुळे मिरची तोडण्यासाठी मजूर मिळाले नसल्याने अद्यापही बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात पीक आले नाही. तर कोरोनामुळे हळद-दूध हितकारक मानन्यात येत असल्यामुळे आणि परदेशातही हळदीची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात हळदीची निर्यात होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसात हळद, मिरची, धने व मसालाजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणींनी यंदा हात आखडता घेतला आहे. महागाईमुळे मसाल्याच्या पदार्थांमध्ये काटकसर करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.
बॉक्स
तेलंगणा, आंध्र प्रदेशातून मिरची चंद्रपुरात
- चंद्रपूरच्या बाजारपेठेत तेलंगना तसेच आंध्र प्रदेशातून लाल मिरचीची आवक होत आहे.
- बेडगी मिरचीला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासोबतच तिखट मिरचीसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.
- गावरान मिरचीसुद्धा शहरातील बाजारपेठेत उपलब्ध आहे. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० रुपयांची वाढ किलोमध्ये झाली आहे.
---- कोट
वर्षभरासाठी लागणारे तिखट, मसाला, हळद तयार करून ठेवले जाते. तसेच आंबा व लिंबाचे लोणचे आवडत असल्याने त्यासाठी उपयुक्त असे मसालेसुद्धा तयार करीत असतो. परंतु, यंदा मसाल्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने मसाला तयार करण्यास अडचण येत आहे.
- रंजना धनकसार, गृहिणी, चंद्रपूर
--------
पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढे तिखट तयार करून ठेवले जाते. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीच्या दरात ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एका किलोला २५० ते ३०० रुपये दर द्यावे लागत आहेत. यासोबतच हळदीचे भावसुद्धा कडाडले आहेत.
- रंजू राऊत, गृहिणी, चंद्रपूर