बांधकाम रखडल्याने नागरिक त्रस्त
वरोरा : परिसरातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे.. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कामे थांबविले आहे.. पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदकडे अहवाल पाठवून निधीची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उन्हाळ्यामुळे प्रवाशांचे बेहल
राजुरा: तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या उन्ह तापत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छता मोहीमेचे तिनतेरा
चंद्रपूर : कोरोना संकटामध्ये मागील काही महिन्यांपासून स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
भद्रावती : रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. तसेच मोकाट कुत्रे वाहनधारकांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.