जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपाध्यक्ष रेखा कारेकार, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे, रोशनी खान व विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर जि. प. सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. खनिज विकास व मानव विकास मिशनच्या निधीमधून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी या योजनांची माहिती दडवून स्वत:च्या मर्जीने लाभार्थ्यांची निवड केल्याचा आरोप समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, सदस्य संजय गजपुरे, संतोष तंगडपल्लीवार आदींनी केला तर दुसरीकडे विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषयांवर चर्चा अपेक्षित असताना थातूरमातूर चर्चा केल्याची टीका काँग्रेसचे जि.प. सदस्य गजानन बुटके यांनी सभेदरम्यान केली.
विषय समितीला डावलल्याचा आरोप
२०१९-२० या वर्षात खनिज विकास व मानव विकास मिशन अंतर्गत निधी देण्यात आला होता; मात्र जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी विषय समिती, स्थायी समिती किंवा सर्वसाधारण समितीमध्ये योजनेची परवानगी न घेता लाभार्थ्यांची परस्पर निवड केल्याचा आरोप जि. प. पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी केला.
१५० पैकी ३ अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण
जिल्ह्यात २ हजार ३६९ मंजूर विहिरींपैकी २ हजार २३१ विहिरी पूर्ण झाल्या. ५० विहिरींची कामे थंडबस्त्यात आहेत. या सभेत पंचायत समितीनिहाय अंगणवाडी बांधकामाचा आढावा घेतल्यानंतर १५० पैकी केवळ ३ अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती पुढे आली.