चंद्रपूर : शिकारीच्या संशयावरून आठ-नऊ कर्मचाऱ्यांनी थेट गावात जाऊन गावकऱ्यांना अमानुष मारहाण केली. हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर मारहाणीनंतर वीज करंटही लावला. याप्रकरणी संतप्त गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीअंती दोन वन कर्मचाऱ्यांवर कलम ३२४, ३२३, ३४८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील पायली चिंचोली गावकऱ्यांसोबत घडला.
पायली चिंचोली गावातील नागरिकांनी शिकार केली आहे. असा संशय घेऊन बुधवारी दुपारी चंद्रपूर वनविभागाचे आठ ते नऊ कर्मचारी त्या गावात गेले. ईश्वर रामटेके, हनुमान आसूटकर, संदीप आसूटकर या तिघांना ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे चौकशीकरिता घेऊन गेले. तिथे या तिघांना प्लास्टिकच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. शिकार केल्याचे मान्य करीत नसल्याने चार्जिंगच्या बॅटरी मशीनद्वारे त्यांना करंट लावण्यात आला.
गुप्तांगाला करंट लावण्याची दिली अमानुष धमकी
हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर आकाश चांदेकरला विवस्त्र करून गुप्तांगाला करंट लावतो म्हणून ती मशीन त्याच्या गुप्तांगाजवळ नेली. हनुमान आसूटकरला चंद्रपूर येथील रामबाग नर्सरीत नेऊन बेदम मारहाण केली. तसेच संध्याकाळी संदीप व ईश्वर यांना तळपायाला करंट लावून दुखापत करण्यात आली. ते एवढ्यावरच चूप न बसता एक अधिकारी दोन्ही पाय मांडीवर देत उभे राहिले. नंतर रात्री आठ वाजता त्यांना सोडून देण्यात आले. तरीही या कर्मचाऱ्यांचे समाधान न झाल्याने गुरुवारी पुन्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना बोलावून अमानुषपणे मारहाण करून करंट लावण्यात आला. आकाश चांदेकर, संदीप नेहारे, मंगेश आसूटकर, राकेश साव यांनाही बोलावून बेदम मारहाण केली. त्यांच्या हातापायाला करंट लावण्यात आला.
अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य केले. अशा वन अधिकारी व कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी पीडितांसह गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन करण्यात आली. अखेर दूर्गापूर पोलिसांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणी भिमनवार व यादव या दोन वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.
आरोपी मोकाट, संख्या वाढतील
या प्रकरणात गावात सुमारे आठ-नऊ वनकर्मचारी गेले होते. मात्र, दुर्गापूर पोलिसांनी केवळ दोनच वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रानुसार आरोपींची संख्या वाढतील, असे सांगण्यात आले. आरोपींना अटकही करण्यात आली नव्हती.
घटनेची पुनरावृत्ती
चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याने जंगलात जळाऊ लाकडे आणण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना अलीकडेच बेदम मारहाण केली हाेती. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतरही वनविभागाने धडा घेतला नाही. अशाच घटनेची ही पुनरावृत्ती असल्याचे ताशेरे वनविभागावर ओढले जात आहे.