शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी येथील किसानपुत्र फाऊंडेशनच्या माध्यमातून अन्नत्याग उपोषण करण्यात आले. या उपोषणाची सांगता शुक्रवारी सायंकाळी इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे झाली. किसानपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, रवी झाडे, उमाकांत धांडे, प्रमोद काकडे, बळीराज धोटे, प्रदीप देशमुख, संदीप गिर्हे , हबीब शेख, शाहू धांडे,यांची उपस्थिती होती.
१९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावात साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि आत्महत्येला सीलिंगचा कायदा, अत्यावश्यक वस्तूचा कायदा, जमीन अधिग्रहणाचा कायदा जबाबदार आहेत. या कायद्यांचा निषेध व शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कामाच्या ठिकाणी अन्नत्याग करण्याचे आवाहन किसानपुत्र फाउंडेशनने केले होते. याला प्रतिसाद देत अनेकांनी अन्नत्याग केले. प्रास्ताविक विजय बदखल यांनी केले. मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली.