लखमापूर : खासगी वापरासाठी वाहन खरेदी करायचे, नंतर या वाहनाचा वापर वेगळ्याच कामासाठी भाडेतत्वावर करायचा, असा प्रकार अलिकडे गडचांदूर आणि नांदाफाटा परिसरात सर्रास सुरू आहे. अशाच एका वाहनाने धडक दिल्याने अल्ट्राटेक सिमेंट उद्योगातील एक कंत्राटी कामगार ठार झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत शासकीय इस्पितळात उपचार घेत आहे. सदर घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नजिकच्या आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात सिमेंट लोडींग विभागात दर्शन अॅड कंपनी अंतर्गत सिपेल्ली लक्ष्मया इलाई हा पॅकर आॅपरेटर म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी हा कामगार दुसऱ्या पाळीत कर्तव्यावर गेला होता. रात्री १० वाजता पाळी आटोपून घरी जात असता मागून आलेल्या भरधाव कारने ( क्र. एम.एच.३४ एएम-२४१९) धडक दिली. अगदी कंपनीच्या आवारातच हा अपघात झाल्याने सोबतचे कामगार धावून आले. त्यांनी बघितले असता सिपेल्ली लक्ष्मय्या आणि टी. लक्ष्मण हे दोघे पॅकर आॅपरेटर जखमी अवस्थेत आढळले. लगेच त्यांना चंद्रपूरला हलवत असताना सिपेल्ली लक्ष्मय्या याचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसरा टी.लक्ष्मण यास गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान अपघात होताच कारचालक भरधाव वेगाने गडचांदूर मार्गे पळून गेला. तथापि नांदाफाटा द्वारावर कंपनीने उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातून हे वाहन सुटू शकले नाही. लगेच पोलिसांना वाहन क्रमांक देण्यात आल्याने रात्रीच हे वाहन गडचांदूर ठाण्यात जमा करण्यात आले. दरम्यान कारचालक अविनाश मनोहर चव्हाण यास काल मंगळवारी नांदाफाटा पोलिसांनी अटक केली. सदर वाहन हे आवारपूर येथील एका शिक्षकाच्या मालकीची आहे.
प्रवासी कारच्या धडकेत कामगार ठार
By admin | Published: November 26, 2014 11:03 PM