आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिराचा कारभार चालविण्यासाठी रविवारपासून निरीक्षक रुजू झाले आहेत. निरीक्षकांनी रुजू होताच दैनंदिन व्यवहाराची माहिती जाणून घेत मंदिरातील रजिस्टर, देणगी पावती पुस्तिका, धर्मशाळांच्या पावती पुस्तिका आपल्या ताब्यात घेतल्या. रात्री उशिरापर्यंत मंदिरातील दानपेट्या पोलिसांसमक्ष खोलून पेट्यांना सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती आहे.देवी महाकाली मंदिरावरील आजवर असलेल्या श्री महाकाली देवस्थान चांदा ट्रस्टचा मालकी हक्क संपुष्टात आला आहे. १८ मार्च ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत यात्रेदरम्यान मंदिराचा कारभार बघण्यासाठी सहायक धर्मदाय आयुक्त रामचंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निरीक्षक सुधाकर परशराम पेटकर हे रविवारी आदेशानुसार सकाळी ११ वाजताच्या सुमारास महाकाली मंदिरात रुजू झाले. रुजू होताच त्यांनी मंदिरातील दैनंदिन व्यवहाराची माहिती घेतली. दैनंदिन व्यवहाराचे जुने रजिस्टर ताब्यात घेऊन नवीन रजिस्टर मेंटन केले आहे. त्यानंतर भाविकांकडून देण्यात येणाऱ्या देणग्यांच्या पावती पुस्तिकाही ताब्यात घेतल्या आहेत.मंदिर परिसरात भाविकांसाठी असलेल्या धर्मशाळांची निरीक्षक पेटकर यांनी पाहणी केली. धर्मशाळेत किती खोल्या आहेत, त्याचे किती भाडे आकारले जाते, याचीही माहिती घेतली.त्यानंतर त्याच्याही पावती पुस्तिका ताब्यात घेतल्या. सोमवारपासून देणगी व धर्मशाळांच्या व्यवहाराकरिता नवीन पावती बुक देण्यात येणार आहे, अशी माहिती निरीक्षक पेटकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.दानपेट्या करणार सीलआदेशानुसार रविवारी दुपारीच दानपेट्या पोलिसांसमोर पंचनामा करून सील करायच्या होत्या. मात्र ट्रस्टचे महाकाले हे काही कामानिमित्त वर्धेला गेले आहेत. दानपेट्यांच्या चाव्या त्यांच्याकडे असल्याने दुपारी ही प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र रात्री महाकाले वर्धेवरून परत आल्यानंतर दानपेट्या उघडून त्या सील करण्यात येणार असल्याचे पेटकर यांनी सांगितले.साडी-चोळी, नारळ जमारविवारी गुढीपाडवा असल्यामुळे महाकाली मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती. अनेक भाविकांनी साडी-चोळी, नारळ देवी महाकालीच्या चरणी अर्पण केले. दान केलेल्या सर्व वस्तू एका ठिकाणी जमा करण्यात आल्या असून त्याचा यात्रेनंतर लिलाव करण्यात येणार आहे.
महाकाली मंदिराचा कारभार पाहण्यासाठी निरीक्षक रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:17 PM
चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिराचा कारभार चालविण्यासाठी रविवारपासून निरीक्षक रुजू झाले आहेत.
ठळक मुद्देदैनंदिन व्यवहाराची घेतली माहिती : पावती पुस्तिका ताब्यात