चंद्रपूर: पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि सायबर क्राईमवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस पाटलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या पुढाकारातून मंगळवारी येथील पोलीस मुख्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक पोलीस पाटील सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून पोलीस पाटलांना कामाची योग्य दिशा व प्रेरणा मिळाली.कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर उपस्थित होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप दिवाण यांनी आपल्या मार्गदर्शनातून पोलीस पाटलांची भूमिका व त्यांचे कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. समाजातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस पाटील हा गावतपातळीवरील प्रमुख आणि महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे.तसेच सायबर गुन्हेगारी तसेच नेट बँकिंग संबंधित गुन्ह्याबाबत पोलीस पाटलांनी ग्रामपातळीवर जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यशाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचा सत्कारही करण्यात आला. (प्रतिनिधी)
कार्यशाळेतून पोलीस पाटलांना मिळाली प्रेरणा
By admin | Published: February 17, 2016 12:54 AM