भद्रावती : ऐतिहासिक नगरीत येताच माझ्या दृष्टीस सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची प्रतिमा एकाच फ्रेममध्ये दिसून आली, ही बाब अत्यंत दुर्मीळ आहे. समाजात ठिकठिकाणी दिसून येणारे मतभेद, द्वेष आणि मत्सर यांच्या भिंतीपलीकडे जाऊन सर्वधर्मीयांसाठी ह्युमन वेल्फेअर मल्टिपर्पज असोसिएशन कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी केले.
कोरोना नियमांचे पालन करीत शहरातील श्री मंगल कार्यालयात ह्युमन वेल्फेअर मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अपनापन स्व. सुल्ताना बेगम निराधार केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, असोसिएशनच्या अध्यक्ष शाहिस्ता खान पठाण, नागपूरचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, सभापती वासुदेव ठाकरे, इंटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, उपाध्यक्ष फय्याज शेख, राकाँ तालुकाध्यक्ष सरपंच सुधाकर रोहणकर आदी उपस्थित होते. अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्ष शाहिस्ता पठाण, तर सूत्रसंचालन नौशाद सिद्दिकी यांनी केले. आभार कौसर खान यांनी मानले.