बाप्पाची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:20 AM2018-09-14T00:20:00+5:302018-09-14T00:21:12+5:30
मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. गणेश भक्तीची आराधना दहा दिवस सुरू राहणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू होती. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले होते. गुरूवारी बाजारपेठेत गर्दी उसळण्याची शक्यता बघून अनेकांनी दोन दिवसांपासूनच गणेशमूर्ती विकत घेऊन घरी ठेवल्या होत्या. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले होते. गुरूवारी सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. हिंदी सिटी शाळेपासून जयंत टॉकीज मार्गापर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. सायंकाळी साडेसात वाजता वाजेपर्यंत गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी हिंदी सीटी हायस्कूलच्या मागील परिसरात भक्तांची गर्दी कायम होती. ढोल ताशांच्या गजरात गणेश मंडळांनी रात्री उशीरापर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापणा केली.
हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यान गर्दीच गर्दी
आपल्या लाडक्या बाप्पाला अनेकांनी चारचाकी वाहन व आॅटोरिक्षातून घरी नेले. काहींनी दुचाकी आणल्या होत्या. दुचाकीवर मागे बसणाऱ्यांच्या हातात मूर्ती ठेवायचे, असे नियोजन होते. हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर मूर्ती घेऊन दुचाकीवर बसताना अडचणीचे ठरत होते. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्तेही वाहने घेऊन मूर्ती विकत घेण्यासाठी या परिसरात आले होते.
मूर्तीच्या किमतीत ३० टक्क्याने वाढ
गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या किंमती वाढल्या. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किंमतीमध्ये ३० टक्क्याने वाढ झाली. पीओपी मूर्तीवर बंदी आल्याने मातीच्या मूर्ती विकत घेण्याची मानसिकता गणेश भक्तांमध्ये तयार झाली. परिणामी विक्रीवर काही परिणाम झाला नाही. काही भक्तांनी तर दोन आठवड्यांपूर्वीच आॅर्डर देऊन ठेवली होती. पर्यावरणपूरक मूर्तींकडेच भक्तांचा कल आहे, अशी माहिती मूर्तीकारांनी दिली.
पोलीस प्रशासन सज्ज
गुरूवारी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक व इतर रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक, ११० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पुरुष पोलीस कर्मचारी व ३११ अकरा महिला पोलिस कर्मचारी याव्यतिरीक्त ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड जवानांनाही जिल्ह्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
१० दिवस कार्यक्रमांची रेलचेल
गणेशोत्सवात डिजेवर बंदी घातल्याने गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या काही मंडळांनी शासनाच्या या आदेशाचे स्वागत केले. तर काही मंडळांमध्ये नाराजी कायम आहे. बदलत्या काळानुसार उत्सवाच्या स्वरूपात परिवर्तन केले पाहिजे, या हेतूने शेकडो मंडळांनी धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे यंदा नव्यानेच नियोजन केले. कुठलाही उत्सव मिरवणूक असो, डिजे असलाच पाहिजे, अशी धारणा होती. त्यामध्ये आता बदल झाल्याचे दिसून येत आहे. उत्सवादरम्यान सामाजिक संदेश देणारे देखावे व अन्य कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.