लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सफाई कामगार समन्वय समितीच्या निवेदनानुसार प्रलंबित प्रकरणे तसेच मागण्या तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समस्या निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, उपायुक्त गजानन बोकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये सफाई कामगार समन्वय समितीसोबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून द्यावी, प्रलंबित असलेली वारसान हक्काचे प्रकरण निकाली काढण्यात यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, कामगारांना आवश्यक असलेले सफाई साहित्य व इतर किरकोळ सामान उपलब्ध करून द्यावे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वस्तीचे सौंदर्यीकरण दलित वस्तीसुधार निधी अंतर्गत करून देण्यात यावे, लाड पागे समितीनुसार वारसा हक्क लागू करण्यात यावा, ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कामगारांना दुसºया व चौथ्या शनिवारची शासकीय सुट्टी लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतरचे लाभ तात्काळ देण्यात यावे, लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत असल्याने मुलींच्या आश्रमशाळेत महिला कर्मचाऱ्यांची तात्पूरती अथवा कायम स्वरूपात नियुक्ती करण्यात यावी या मुख्य मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सफाई कामगार समन्वय समितीने प्रकाश टाकला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रश्न समजून घेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सफाई कामगारांसाठी श्रमसाफल्य योजनेअंतर्गत भविष्यातील गरज लक्षात घेऊन येत्या पंधरा दिवसात महानगरपालिकेमार्फत जागा निश्चित करावी किंवा समन्वय समितीने स्वत: जागा सुचवावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:29 AM